शिराळे व सडुरे गावातील स्थानिक उत्पादने व वस्तू
सह्याद्रीच्या दाट जंगलाच्या कुशीत वसलेली शिराळे व सडुरे गावे केवळ जैवविविधतेसाठीच नव्हे, तर निसर्गनिर्मित आणि उपयुक्त स्थानिक उत्पादनांसाठीही प्रसिद्ध आहेत. येथे निसर्गाच्या सान्निध्यात उगवणाऱ्या आणि स्थानिकांच्या मेहनतीने गोळा करण्यात येणाऱ्या अनेक वस्तू पर्यटकांसाठी खास आकर्षण असतात.
🍯 गावठी मध
शिराळे गावातील गावठी मध फारच लोकप्रिय आहे.
- पूर्णपणे निसर्गनिर्मित व शुद्ध मध.
- सह्याद्रीच्या कपारीतून पारंपरिक पद्धतीने स्थानिक ग्रामस्थ मध गोळा करतात.
- भेसळविरहित असल्याने पर्यटकांसाठी मिळणे ही खरी पर्वणी ठरते.
- फुरसंगी,जांभूळ, करवंद सह अनेक इतर औषधी वनस्पतींच्या फुलातून मधमाशी मकरंद गोळा करत असल्याने हा मध औषधी गुणांनी समृद्ध असतो


🌿 वेताची काठी – सह्याद्रीचं दुर्मिळ वरदान
सह्याद्रीच्या घनदाट जंगलात उगवणाऱ्या अनेक दुर्मिळ वनस्पतींपैकी वेताचं झाड हे खास महत्वाचं मानलं जातं. या झाडांपासून मिळणारी वेताची काठी केवळ निसर्गाची देणगी नसून, ती धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा अविभाज्य भाग आहे.
वेताची काठी प्रामुख्याने देवपूजा, धार्मिक विधी आणि पारंपरिक समारंभांमध्ये वापरली जाते. गावागावात होणाऱ्या उत्सवांमध्ये, यात्रांमध्ये आणि घरोघरी देवपूजेत या काठीला विशेष स्थान दिलं जातं. काही ठिकाणी तर घरात वेताची काठी असणे म्हणजे समृद्धी आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते.
धार्मिक महत्त्वामुळेच या काठीची मागणी वर्षभर मोठ्या प्रमाणावर असते. पर्यटक आणि भाविक देखील सह्याद्रीच्या जंगलात वेताची काठी पाहून प्रभावित होतात. परंतु तिच्या दुर्मिळतेमुळे आणि पर्यावरणीय महत्वामुळे स्थानिक ग्रामस्थ या वनस्पतीचं संवर्धन करण्यावर भर देतात.
अशा प्रकारे वेताची काठी ही निसर्ग, श्रद्धा आणि परंपरा यांचा सुंदर संगम आहे. सह्याद्रीच्या जंगलातली ही अनोखी देणगी गावाच्या सांस्कृतिक ओळखीचा अभिमानाने वारसा जपते.
🍃 जंगली कडीपत्ता
सह्याद्रीच्या जंगलात अनेक दुर्मिळ औषधी व मसाल्याच्या वनस्पती आढळतात. त्यापैकीच एक म्हणजे जंगली कडीपत्ता. स्थानिक जंगलभागात मोठ्या प्रमाणावर वाढणारा हा कडीपत्ता त्याच्या खास सुगंध आणि चवीसाठी ओळखला जातो.
दैनंदिन स्वयंपाकात वापरला जाणारा कडीपत्ता आपणास परिचित असतो, पण जंगली कडीपत्ता त्यापेक्षा पूर्णतः वेगळा आणि अनोखा आहे. या पानांचा वास अधिक ठसठशीत असून, चवीत एक वेगळीच मसालेदार झणझणीतपणा जाणवतो. त्यामुळे स्थानिक जेवण, मसाले व खास पदार्थांना एक अद्वितीय चव मिळते.
स्थानिक ग्रामस्थ या पानांचा वापर फक्त स्वयंपाकातच नव्हे तर औषधी उपयोगासाठीही करतात. पचन सुधारण्यासाठी, शरीराला ताजेतवाने करण्यासाठी आणि घरगुती उपाय म्हणून याचा उपयोग केला जातो.
पर्यटकांना सडुरे–शिराळे गावात आल्यावर हा जंगली कडीपत्ता पाहणे व अनुभवणे ही एक वेगळीच आनंदाची गोष्ट असते. निसर्गनिर्मित खास चव आणि सुगंध अनुभवायचा असेल, तर सह्याद्रीतील हा जंगली कडीपत्ता नक्की लक्षात ठेवावा.

🌱 शिकेकाई
शिराळे जंगलात आढळणारी शिकेकाई वनस्पती केसांच्या संगोपनासाठी उपयुक्त आहे.
केस मऊ, लांब व निरोगी ठेवण्यासाठी पारंपरिक उपाय.
स्थानिक बाजारपेठेत याची मागणी कायम असते.
🌸 सुरुंगीची फुले
सह्याद्रीच्या उंच ठिकाणी आढळणारी सुरुंगीची फुले अतिशय सुगंधी असतात.
अत्तर निर्मितीसाठी वापर.स्थानिक स्त्रिया याच फुलांपासून गजरे बनवतात.हे एक नगदी पीक असून, गोळा करणे मेहनतीचे काम आहे.
🌿 अम्मल कांदा
औषधी गुणधर्म असलेली ही वनस्पती मानव व जनावरांतील मुक्कामार शमविण्यासाठी उपयुक्त ठरते.
🌿 सतरंगी पाळ
ही दुर्मिळ औषधी वनस्पती गालगुंड व अंगावरील सूज कमी करण्यासाठी आजही स्थानिक वापरतात.
🌿 पांढरीची काठी
वेताच्या काठीसारखीच धार्मिक महत्त्व असलेली पांढरीची काठी घरात असणे म्हणजे घराच्या भरभराटीचे प्रतीक मानले जाते.
🌿 काळी हळद
शिराळेच्या दाट जंगलात आढळणारी काळी हळद ही दुर्मिळ होत चाललेली वनस्पती आहे.
धार्मिक विधींसाठी उपयोग.आयुर्वेदीक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान.
इतर वनस्पती व वस्तू
याशिवाय येथे अनेक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आढळतात
काळा कुडा, कापरपेंडी, माटंगीचा पाला, रक्तवाढ साल, चांद्यागोंद्याचे फळ, विकारीची साल इत्यादी.